समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही महत्वाचे : जान्हवी धारीवाल- बालन

पुणे : रसिकशेठ धारीवाल यांनी आर.एम.डी. फाउंडेशनची स्थापना करून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. हे सर्व प्रकल्प करताना आई शोभा धारीवाल यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आर.एम.डी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल यांनी केले.
यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर. धारीवाल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे विश्वस्त नितीन देसाई, इंद्राणी बालन फाउंडेशन आणि बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया, रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग आणि शिकाऊ विद्यार्थी उपस्थित होते.
फाउंडेशनने सुरू केलेल्या प्रकल्पात गुजरात राज्यातील मोफत उपचार देणारे कॅन्सर हॉस्पिटल, ससून पुणे येथील सर्व सोयीयुक्त अपघात रुग्णालय, नाशिक येथील आर. एम. डी. हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पूना हॉस्पिटल येथे कार्डीयाक कक्ष, तसेच शिक्षण क्षेत्रात फार्मसी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इंग्रजी शाळांची स्थापना, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती, पर्यावरण क्षेत्रात खडवासला धरणाचा गाळ काढून पाण्याचा स्तर वाढवणे, शेतकऱ्यांसाठी बंधारे बांधणे इत्यादी समाजपयोगी कामे केली आहेत, असे जान्हवी धारीवाल म्हणाल्या.
फाउंडेशन द्वारा आयोजित शोभाताई आर. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी, ५०१ मोतीबिंदू रुग्णांच्या तपासणी आणि शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, रक्तदान शिबीर आणि आर. एम. डी. इंग्रजी शाळा कोंढवा, लोणीधामणी गाव, कासारी गाव, नवलेवाडी पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण असे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहनही जान्हवी धारीवाल यांनी यावेळी केले.
समाजाचे ऋण फेडताना कमाईतील वाटा समाजासाठी खर्च करणे ही सामाजिक जबाबदारी असून, आज शोभा धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त नक्कीच हॉस्पिटल च्या कार्यात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन पुनीत बालन यांनी यावेळी दिले. त्यानंतर फाउंडेशनद्वारा प्रायोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा धनादेश आणि शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले.





