T20 Asia Cup : टी-२० आशिया कपमध्ये फक्त ‘या’ दोन फलंदाजांनी झळकावलयं शतक, कोण आहेत? जाणून घ्या

Century Record in T20 Asia Cup : दुबई आणि अबू धाबी येथे ९ सप्टेंबर २०२५ पासून आशिया कप २०२५ ची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळली जाणार असून, यंदा तिसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये आशिया कप आयोजित होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. आतापर्यंत टी-२० एशिया कपमध्ये फक्त दोन फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत.
ज्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हाँगकाँगचा बाबर हयात यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दोघांनीही १२२ धावांची खेळी साकारली आहे. चला जाणून घेऊया या दोन शतकांविषयी…
विराट कोहलीचे २०२२ मध्ये झळकावले होते शतक –
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी टी-२० आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी साकारली होती. ही त्याची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली शतकी खेळी होती. कोहलीने सलामीला येत ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना १०१ धावांनी जिंकला होता.
बाबर हयातचने २०१६ मध्ये झळकावले होते शतक –
विराट कोहलीपूर्वी हाँगकाँगचा बाबर हयातने १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ओमानविरुद्ध शतक झळकावले होते. प्रथम फलंदाजी करताना ओमानने ५ बाद १८० धावा केल्या. जतिंदर सिंग (४२ धावा) आणि आमिर अली (नाबाद ३२) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात, हाँगकाँगला २० षटकांत ७ बाद १७५ धावाच करता आल्या.
हेही वाचा – Indian Squad : आशिया कपसाठी भारताचा संघ जवळपास निश्चित! कोणाला संधी आणि कोण बाहेर? जाणून घ्या
बाबर हयातने ६० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ७ षटकारांसह १२२ धावांची खेळी केली, तरीही हाँगकाँगला ५ धावांनी पराभव पत्कारावा लागला. या दोन शतकांनी टी-२० आशिया कपच्या इतिहासात विशेष स्थान मिळवले आहे. आता २०२५ च्या स्पर्धेत नवे विक्रम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





