Borghat Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! कंटेनर-टेम्पो दरीत कोसळले; चालकाचा जागीच मृत्यू
Borghat Accident: कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील टेम्पोला धडक; बोरघाटातील ४० ते ५० फूट खोल दरीत दोन्ही वाहने कोसळली.

Borghat Accident – कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोरील टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने बोरघाटातील सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि. २८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ३९ व्या किलोमीटरवर भरधाव कंटेनर (एमएच ४३ वाय ३५७०) याने समोरील टेम्पो (एमएच ०४ एलक्यू ४९१३)ला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर जाऊन बोरघाटातील दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या.
कंटेनर खोल दरीत गेल्याने त्यातील चालकाचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढून खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, टेम्पोचालक मिराज शेख (वय २९) हा या अपघातातून बचावला. मात्र टेम्पो दरीत अडकून राहिला. बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग पथक, देवदूत यंत्रणा,
महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. १०८ रुग्णवाहिका आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्यही बचावकार्यात सहभागी झाले. दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने तसेच दरीचा भाग खोल असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरले.





