IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी केली संघाची घोषणा, पहिल्या कसोटीतच टीम इंडियाला दिलं सरप्राइज….

Border Gavaskar Trophy 2024-25 (IND vs AUS ) : येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार असून, त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने सध्या फक्त पहिल्या कसोटीसाठीच संघ जाहीर केला असून त्यात टीम इंडियासाठी एक मोठे सरप्राईज आहे.
खरं तर, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी, भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया-अ संघाने भारत-अ संघाचा मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीचा पर्थ येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मॅकस्वीनीसाठी ही भेट आणि टीम इंडियासाठी सरप्राईज आहे.
नॅथन मॅकस्विनीने भारत अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या चार डावात 55.33 च्या सरासरीने 166 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत कायमस्वरूपी सलामीवीर सापडलेला नाही. त्यामुळे वॉर्नरच्या जागी नॅथन मॅकस्वीनीला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते.
मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले मॅकस्विनीचे निवड करण्याचे कारण…
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी आधीच स्पष्ट केले होते की, स्टीव्ह स्मिथ त्याच्या जुन्या बॅटिंग ऑर्डरमध्ये दिसणार आहे. नॅथन मॅकस्वीनी निवडण्याच्या कारणाबद्दल जॉर्ज बेलींनी सांगितले की “मॅकस्विनीने नुकतेच दाखवून दिले आहे की तो धावा करू शकतो. त्याच्या उत्कृष्ट देशांतर्गत विक्रमांमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया-ए संघांसाठी खूप धावा केल्या आहेत.”
The 🇦🇺 Test squad has dropped, so drop us your Border-Gavaskar Trophy predictions #AUSvIND
Full story: https://t.co/J61jGIE6b7 pic.twitter.com/d37PPYhaos
— cricket.com.au (@cricketcomau) November 9, 2024
उर्वरित ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान….
याशिवाय ऑस्ट्रेलिया-ए संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बोलँड हा ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील उर्वरित ऑस्ट्रेलियन संघात काही प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे, जे मागील काही काळापासून कसोटी संघाचा भाग आहेत.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.





