Border–Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडिया जोरदार पुनरागमन करू शकते – जोश हेझलवूड

Border–Gavaskar Trophy 2024-25 : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाने भारताचा आत्मविश्वास डळमळीत झाला असला तरी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ जोरदार पुनरागमन करू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज होश हेझलवूडने बोलताना व्यक्त केले.
न्यूझीलंडने भारताला घरच्याच मैदानावर क्लीन स्वीप दिला होता. घरच्या भूमीवर सलग तीन किंवा अधिक कसोटी सामन्यात पूर्ण पराभव स्वीकारण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. सलग तीन पराभवांमुळे विश्वकसोटी स्पर्धेतील अव्वल स्थान देखील भारताने गमावले असून आता फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे (Border–Gavaskar Trophy 2024-25) खडतर आव्हान पेलावे लागणार आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्ड वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जोश हेझलवूड म्हणाला की, “ते (भारत) जखमी सिंहाप्रमाणे माघारी परतण्याचा निर्धार करतील. मालिका सुरू झाल्यावरच गोष्टी कशा प्रगती करत आहेत हे आम्हाला कळेल. विश्वकसोटी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये भारतासमोर पाच पैकी चार समाने जिंकण्याचे कठीण आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या पराभवाने त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील काही खेळाडू येथे खेळले आहेत, मात्र काहींना येथे फलंदाजीचा अजिबातच अनुभव नाही. त्यामुळे भारताला कशा प्रकारच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, याची खात्री नाही. मात्र, येथील कसोटीचे निकाल नक्कीच चांगले असतील.
तेव्हा ॲशेसमध्ये खेळल्यासारखे असते…
भारतामध्ये न्यूझीलंड संघाने चांगले क्रिकेट खेळले याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. आम्ही देखील आगामी मालिकेसाठी उत्सुक असल्याचे सांगताना हेझलवूड म्हणाला, भारताविरुद्धची मालिका ही नक्कीच आव्हानात्मक असते. या मालिकेत आम्ही खेळतो, तेव्हा आमच्यासाठी ॲशेसमध्ये खेळल्यासारखे असते. मला खात्री आहे की आमचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक…
पहिली कसोटी – 22 ते 26 नोव्हेंबर – पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी – 06 ते 19 डिसेंबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
तिसरी कसोटी – 14 ते 18 डिसेंबर – द गाबा, ब्रिस्बेन.
चौथी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी – 03 ते 07 जानेवारी – सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी.





