Rishabh Pant Injury : ऋषभ पंत पुन्हा जखमी! मैदान सोडलं, पुन्हा परतला, पण भुवनेश्वरने केलं आऊट; लखनौच्या गोटात चिंतेचं वातावरण
Rishabh Pant Injury : या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे.

Rishabh Pant Injury RCB vs LSG : आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पंतला वेदनांमुळे मैदान सोडावे लागले, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
नाणेफेक जिंकून आरसीबीने लखनौला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. एडन मार्करम स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला. पाचव्या षटकात जोश हेझलवूडने टाकलेला एक उसळता चेंडू पंतच्या कोपरला (Elbow) जोरात लागला. चेंडू लागताच पंत प्रचंड वेदनेने विव्हळला. फिजियोनी मैदानात धाव घेत उपचार केले, मात्र वेदना असह्य झाल्याने पंतला मैदान सोडून बाहेर जावे लागले.
दुखापतीनंतरही मैदानात परतला, पण…
Rishabh Pant gets a blow on his Elbow
What a bowling this by RCB ❤️, Hazlewood ☠️ test match lines and result for him ! Krunal gets 2 wickets! #RCBvsLSG #IPL2026 pic.twitter.com/BvRTGLn4lo
— Cricket IQ (@S17Anurag) April 15, 2026
पंत गेल्यानंतर मिचेल मार्श (४०), मुकुल चौधरी (३९) आणि आयुष बडोनी (३८) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १६ व्या षटकात ११८ धावांवर ५ वी विकेट पडल्यानंतर पंत पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात परतला. मात्र, दुखापतीचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर स्पष्ट दिसत होता. तो ६ चेंडूंत केवळ १ धाव काढून भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर फिल साल्टकडे झेल देऊन बाद झाला. लखनौचा संपूर्ण संघ १४६ धावांवर गारद झाला.
पुन्हा एकदा दुखापतीचे ग्रहण –
ऋषभ पंतसाठी २०२६ हे वर्ष दुखापतींच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच तो ‘साइड स्ट्रेन’ दुखापतीतून सावरला होता. जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सराव करताना त्याला कमरेच्या स्नायूंना दुखापत झाली होती. यंदाच्या आयपीएलमध्येही पंतला आपला जुना फॉर्म गवसलेला नाही. ५ सामन्यांत त्याने केवळ १०४ धावा केल्या असून, हैदराबादविरुद्धच्या ६८ धावांचा अपवाद वगळता ७, १० आणि १८ अशा धावसंख्येवर तो बाद झाला आहे. आता कोपरच्या या नवीन दुखापतीमुळे तो पुढील सामन्यांना मुकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





