IND vs AUS (Cheteshwar Pujara vs Josh Hazlewood) – येत्या शुक्रवारपासून पर्थ येथे सुरू होत असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा सामना करावा लागणार नसल्यानं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आनंद व्यक्त केला आहे.
पुजारा याने गेल्या दोन दौऱ्यांवर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पुजाराने 2018-19 मध्ये चार कसोटी सामन्यांच्या सात डावांमध्ये 1 हजार 258 चेंडू खेळून तीन शतके झळकावली होती आणि तो भारताच्या विजयाचे शिल्पकारापैकी एक होता. तसेच साल 2020-21 च्या मालिकेत देखील त्याने 928 चेंडू खेळले, जे या मालिकेतील कोणत्याही फलंदाजाकडून खेळल्या गेलेल्या चेंडूपैकी सर्वाधिक होते आणि यावेळीही त्याने विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
पहिल्या कसोटीपूर्वी हेझलवूडने पत्रकारांना सांगितले की, “पुजारा भारतीय संघात नसल्याचा मला आनंद आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तो अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याची विकेट प्रत्येक गोलंदाजांला नेहमी घ्यायची असते.”
भारताकडे अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत असं सांगताना तो म्हणाला की, “भारतीय संघात नेहमीच तरुण आणि नवीन खेळाडू येत असतात. त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचे खूप दडपण आहे, त्यामुळे जो कोणी भारतीय इलेव्हनमध्ये असेल, तो खूप प्रतिभावान असेल.”
IND vs AUS : ऑस्ट्रेलियातून येताना जैस्वाल ‘यशस्वी’ फलंदाज म्हणून परतेल – रवी शास्त्री
दुखापतीतून सावरल्यानंतर पूर्वार्धात न खेळू शकणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची भारताला उणीव भासेल, असेही त्याने सांगितले. पुढे तो म्हणाला की, “भारताला शमीची उणीव भासेल ज्याने 60 कसोटी सामने खेळले आहेत आणि तो एक अनुभवी गोलंदाज आहे. मात्र जसप्रीत बुमराहही एवढी वर्षे तरुणांचे नेतृत्व करण्याचे काम करत आहे. पहिल्या कसोटीतही तो कर्णधार आहे आणि आशा आहे की खेळाडूंना त्याच्याकडून प्रेरणा मिळेल.”