IND vs AUS : ऑस्ट्रेलियातून येताना जैस्वाल ‘यशस्वी’ फलंदाज म्हणून परतेल – रवी शास्त्री

Border-Gavaskar Trophy 2024/25 : – यशस्वी जैस्वाल एक गुणी खेळाडू आहे. तो चांगली फलंदाजी करतो. यशस्वी जैस्वालने पर्थच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर धावा केल्या तर तो, मालिकेतील उर्वरित सामने आरामात खेळू शकेल. तो कशा प्रकारे आव्हानाचा सामना करतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मात्र, तो ऑस्ट्रेलियातून येताना यशस्वी फलंदाज म्हणूनच परतेल, असा विश्वास भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 कसोटी सामान्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून भारतीय खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये कसून सराव देखील केला आहे. मायदेशात 36 वर्षानंतर भारताने न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौरा खडतर असणार आहे. न्यूझीलंड सोबत खेळताना यशस्वी जैस्वालने चांगल्या धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत देखील जैस्वालकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
फॉक्स क्रिकेटच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रवी शास्त्री म्हणाले, मागील काही काळामध्ये यशस्वीने फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. आधीच तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध देखील दमदार फलंदाजी केली होती. तो फलंदाजी सहजरित्या करत असल्याने तो, ऑस्ट्रेलियामधून परतल्यावर अजून चांगली फलंदाजी करू शकेल.
यशस्वी चांगला फलंदाज असला तरी, त्याला परिस्थितीनुसार खेळावे लागणार आहे. पर्थ येथील खेळपट्टीवर भरपूर उसळी असणार आहे. त्यामुळे पर्थच्या खेळपट्टीवर चांगल्या फलंदाजाचा देखील कस लागतो. कोणत्याही परिस्थितीसाठी तुम्हाला तयार राहावे लागणार आहे. अशा खेळपट्टीवर तुम्ही यशस्वी झालात, तर भविष्यात देखील तुम्ही चांगला खेळ करू शकता.
तुम्हाला सर्वोत्तम द्यावेच लागणार….
मी तीन वेळेस प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलो आहे. येथे खेळताना तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागणार आहे. ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून चांगलाच खेळ करावा लागणार आहे. त्यांना थोडासा देखील वाव देता येणार नाही. येथे विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑस्ट्रेलिया संघाला दबावाखाली ठेवण्याशिवाय इतर कोणताच मार्ग नाही, असे शास्त्री बोलताना म्हणाले.
विराट चांगली कामगिरी करेल…
विराट कोहली देखील सध्या धावांसाठी झुंजत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याला मोठी खेळी करण्यात यश मिळाले नाही. यासदंर्भात बोलताना शास्त्री म्हणाले, कसोटी मालिकेच्या सुरुवातीपासून विराट चांगली कामगिरी करताना पुन्हा धावा काढण्यास सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ यांच्यावर सर्वांची नजर असल्याचे शास्त्री यांनी बोलताना सांगितले.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत चेतेश्वर पुजारा दिसणार एका नव्या भूमिकेत…
उसळी मारणाऱ्या खेळपट्ट्या जैस्वालला आवडतात. अशा खेळपट्ट्यावर चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येत असल्याने तो अशा खेळपट्टीवर तो मुक्तपणे धावा करू शकतो. यापूर्वी यशस्वी अनेक आव्हानांना तोंड देत आला आहे. त्यामुळे त्याच्या नजरेत सातत्याने धावांची भूक दिसून येते असे शास्त्री यांनी म्हटले.





