Border-Gavaskar Trophy 2024/25 : विराट ते अश्विन…! भारतीय दिग्गजांना अनेक ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी…

सिडनी :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल आणि मालिका मोठ्या फरकाने जिंकावी लागेल. या मालिकेत भारतीय दिग्गजांना अनेक ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
1. विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 8 शतके झळकावली आहेत. आता या मालिकेत कोहली आणखी दोन शतके झळकावण्यात यशस्वी ठरला तर तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनेल. आतापर्यंत हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (9 शतके) नावावर आहे.
2. विराट कोहलीने 21 धावा केल्यानंतर कोहली 2000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा कोहली हा सातवा फलंदाज ठरणार आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 3264 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहे ज्याने 2143 धावा केल्या आहेत.
3. विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकूण 6 शतके झळकावण्यात यश मिळवले आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 6 शतके झळकावली आहेत. आणखी एक शतक झळकावल्यानंतर कोहली ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनेल.
4. बॉर्डर-गावस्कर मालिकेत रोहित शर्मा 292 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 1000 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल. रोहितने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 कसोटीत 708 धावा केल्या आहेत.
5. स्पिनर रविचंद्रन अश्विनने तीन विकेट घेतल्यास तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. अश्विनने आतापर्यंत 22 सामन्यांत 114 विकेट घेतल्या आहेत.
6. या ट्रॉफीमधील सामन्यात अश्विनने 5 विकेट्स घेण्यात यश मिळवले तर तो शेन वॉर्नला मागे टाकेल. आत्तापर्यंत अश्विनने कसोटीत 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर शेन वॉर्ननेही कसोटीत 37 वेळा 5 बळी घेतले आहेत.
7. या मालिकेत 11 विकेट घेताच जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी पूर्ण करेल. रवींद्र जडेजाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 89 बळी घेतले आहेत.
8. शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 200 धावा कमी आहे. आतापर्यंत गिलने कसोटीच्या 54 डावात फलंदाजी करताना 1800 धावा केल्या आहेत. गिलच्या नावावर 5 शतके आणि 7 अर्धशतके आहेत.
9. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतही 3 हजार धावा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतो. 307 धावा करताच पंत कसोटीत 3000 धावा पूर्ण करेल. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 376 धावा करून पंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 धावा पूर्ण करेल.
10. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथही इतिहास रचण्याच्या जवळ आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत 315 धावा करण्यात स्मिथ यशस्वी ठरला तर तो त्याच्या कसोटी कारकिर्दीत 10,000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा स्मिथ हा जगातील 15वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरणार आहे.





