Arshdeep Singh : अर्शदीपवर अन्याय होतोय? टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर अश्विन संतापला; म्हणाला, ‘तो अशा वागणुकीला…’

R Ashwin on Arshdeep Singh Dropped : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्या दोन सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवल्यामुळे भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. राजकोटमधील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई झाल्यानंतर अश्विनला हा संताप अनावर झाला.
अर्शदीपला बाहेर ठेवणं चुकीचं; अश्विनने मांडली व्यथा
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर या प्रकरणावर सडेतोड भाष्य केले. तो म्हणाला, “अर्शदीपने जेव्हा जेव्हा चेंडू हातात घेतला, तेव्हा त्याने संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तो सन्मानाने संघात येण्यास पात्र आहे. त्याला पहिल्या दोन सामन्यांत का खेळवलं नाही? आता तिसऱ्या सामन्यात संधी देऊन काय उपयोग?” असा सवाल अश्विनने उपस्थित केला.
अश्विन पुढे म्हणाला, “मी स्वतः या परिस्थितीतून गेलो आहे, त्यामुळे अर्शदीपच्या मनातील भावना मला नीट समजतात. जेव्हा एखादा खेळाडू सलग सामने खेळत नाही, तेव्हा त्याची लय (Rhythm) बिघडते आणि पुढच्या वेळी तो मैदानात उतरतो तेव्हा तो पूर्ण तयारीत नसतो.”
वर्कलोड मॅनेजमेंट की आत्मविश्वासाशी खेळ?
आगामी टी-२० विश्वचषक २०२६ (भारत आणि श्रीलंका) डोळ्यासमोर ठेवून अर्शदीपच्या कामाचा ताण कमी केला जात असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. मात्र, अश्विनने हा तर्क फेटाळून लावला आहे. “एवढी चांगली कामगिरी करूनही स्वतःच्या जागेसाठी लढावं लागणं हे दुर्दैवी आहे. क्रिकेट हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. गोलंदाजांसोबतच असं वारंवार का घडतं? फलंदाजांच्या बाबतीत असा प्रयोग का केला जात नाही?” असा बोचरा सवाल त्याने विचारला आहे.
हेही वाचा – David Warner Record : डेव्हिड वॉर्नरचा धमाका! तुफानी शतक झळकावत विराट कोहलीचा मोडला विक्रम
अर्शदीप सिंगची दमदार आकडेवारी –
अर्शदीप सिंगने आतापर्यंत मिळालेल्या संधींचे सोने केले आहे. त्याची आकडेवारी त्याच्या निवडीचे समर्थन करते:
- वनडे रेकॉर्ड: १४ सामन्यांत २२ बळी.
- नजीकची कामगिरी: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तिन्ही सामन्यांत सहभाग आणि प्रभावी मारा.
- सध्याची स्थिती: गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्याला नियमित संधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.





