Pune News : भारत पाकिस्तान या देशांमध्ये शस्त्रसंधी घोषित करण्यात आल्यानंतर आता दोन्ही देशांतील सुरू असलेल्या लष्करी कारवाई थांबविण्यात आली आहे. मात्र, भारताने खबरदारीचा उपाय म्हणून देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील ससून रुग्णालयात बॅाम्ब ठेवल्याच्या धमकी देण्यात आली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयातील एका डॅाक्टरच्या मोबाईलर मेसेजद्वारे बॅाम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गांभीर्याने दखल घेत रुग्णालयातील परिसरातील संपूर्ण परिसर चेक केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळापणा केला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पण या धमकीला गांभीर्याने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बंड गार्डन पोलिसांनी सखोल तपासाला सुरूवात केली. यादरम्यान पोलिसांना खबऱ्यांच्या आधारे मोठी माहिती मिळाली. रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याच्या माध्यमातून मिळाली. यानंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षक तरुणाला येरवडा भागातून अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव अरविंद कृष्णा कोकणी (वय २९ वर्ष) असे आहे. सुरूवातीला कोकणी गुन्हा कबूल करत नव्हता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. चोरलेल्या मोबाईलवरून धमकी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुरक्षा रक्षक कोकणी याने ससून रुग्णालयातील एका महिलाचा मोबाईल चोरला होता. त्याच मोबाईलवरून त्याने एका डॅाक्टरला रुग्णालयात बॅाम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेसेज केला. त्यानंतर मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशीही त्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज केल. त्यानंतर पुन्हा त्याने मोबाईल बंद केला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून त्याने हे नेमकं कशासाठी केलं याचा तपास पोलीस करत आहेत.