Bomb Threat : ‘मुंबई, नागपूर’ मध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल; सर्वत्र पसरतले भीतीचे वातावरण

Mumbai | Nagpur | Bomb blast – मुंबई आणि नागपूरमध्ये प्रमुख संस्थांना लक्ष्य करत, बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणाऱ्या ईमेलमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी आणि बॉम्ब नाशक पथकाने व्यापक तपासणी केल्यानंतर कोणतेही स्फोटक पदार्थ न आढळल्याने या सर्व धमक्या अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. बॉम्बे उच्च न्यायालय, अनेक स्थानिक न्यायालये आणि प्रमुख वित्तीय संस्थांना लक्ष्य करणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे हे ईमेल होते.
पोलिसांच्या माहीतीनुसार, दुपारी २ वाजता स्फोट होतील असा इशारा देणारे अनेक ईमेल एकाच वापरकर्त्याने बनावट खात्यावरून पाठवले होते. त्याचा आयपी ॲड्रेस इस्रायलमध्ये असल्याचे आढळले आहे, तथापि याची पडताळणी अद्याप सुरू आहे. हे ईमेल गुरुवारी सकाळी उच्च न्यायालय, सत्र न्यायालय आणि मुंबईतील माझगाव, एस्प्लेनेड, वांद्रे आणि अंधेरी येथील स्थानिक न्यायालयांना प्राप्त झाले.
धमकीच्या ईमेलमुळे सुरक्षेची चिंता निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी मोहिमेसाठी इमारतीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. शोध मोहिमेमुळे नियमित न्यायालयीन कामकाज सुमारे एक तास विस्कळीत झाले. सर्व न्यायालयांच्या खोल्यांची कसून तपासणी करण्यात आली आणि दुपारी ३ वाजता सुनावणी पुन्हा सुरू झाली. बॉम्ब शोधक पथकाने इमारतीची तपासणी करून कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी ती सुरक्षित असल्याचे घोषित केले.
तसेच, नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा एक ईमेल मिळाल्यानंतर, पोलिसांनी परिसराची झडती सुरू केली होती. तपासात, बनावट ईमेल ॲड्रेस तयार करून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. ते सर्व ईमेल एकाच खात्यातून पाठवण्यात आले होते. बनावट खाते असल्याने पोलीस पाठवणाऱ्याचे नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.





