Meenakshi Seshadri : बॉलिवूडची ‘हिरो’ गर्ल करणार दमदार कमबॅक! मीनाक्षी शेषाद्री-जॅकी श्रॉफची आयकॉनिक जोडी पुन्हा दिसणार एकत्र
Meenakshi Seshadri : त्या लवकरच प्राइम व्हिडिओच्या बहुचर्चित 'नानावटी व्हर्सेस नानावटी' या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Meenakshi Seshadri : ८० आणि ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आता पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करत आहेत. अमेरिकेतून मुंबईत परतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांना मोठा ओटीटी प्रोजेक्ट मिळाला असून, त्या लवकरच प्राइम व्हिडिओच्या बहुचर्चित ‘नानावटी व्हर्सेस नानावटी’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
या कोर्टरूम ड्रामाचे दिग्दर्शन प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक विपुल शाह करत असून, या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘हिरो’ या सुपरहिट चित्रपटातील गाजलेली जोडी मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या सीरिजबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमेरिकेत अनेक वर्षे वास्तव्यानंतर मीनाक्षी शेषाद्री नुकत्याच मुंबईत कायमस्वरूपी परतल्या आहेत. अभिनयात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना लगेचच या वेबसिरीजची ऑफर मिळाली. १९८३ मध्ये सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटातून त्या रातोरात स्टार बनल्या होत्या.
आता चार दशकांनंतर जॅकी श्रॉफसोबत त्यांना पुन्हा पाहण्याची संधी चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. निर्मात्यांनी दोघांच्या वयानुरूप भूमिका साकारल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे कथेत नॉस्टॅल्जियासोबतच नवेपणाचाही अनुभव मिळणार आहे.
आठ भागांच्या या क्राइम-कोर्टरूम ड्रामाचे चित्रीकरण सध्या मुंबईतील अंधेरी येथे सुरू असून, पुढील टप्प्यात पवई परिसरात शूटिंग होणार आहे. या वेबसिरीजमध्ये भाग्यश्री, राम कपूर आणि अनुप्रिया गोएंका यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. राम कपूर सध्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ते लवकरच या वेबसिरीजच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहेत.
मीनाक्षी आणि जॅकी श्रॉफ यांनी यापूर्वी ‘हिरो’, ‘दहेज’ आणि ‘अल्लाह रखा’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केले असून, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने एकेकाळी प्रेक्षकांची मने जिंकली होती. काही दिवसांपूर्वी मीनाक्षी यांनी सोशल मीडियावर भारतात परतून पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, ‘नानावटी व्हर्सेस नानावटी’ या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू असले तरी, प्राइम व्हिडिओकडून अद्याप या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रीकरणाचा मोठा टप्पा पूर्ण झाल्यानंतर वेबसिरीजचा फर्स्ट लूक आणि अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sharad Pawar Meet PM: शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली PM मोदींची भेट; काय झालं नेमकं भेटीत ? वाचा





