Rangeela Re-Release: ए.आर. रहमानच्या संगीताने गाजलेली ‘रंगीला’ नव्या अंदाजात री-रिलीज

Rangeela Re-Release: राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सुपरहिट फिल्म ‘रंगीला’ला प्रदर्शित होऊन तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. ८ सप्टेंबर १९९५ रोजी रिलीज झालेली ही फिल्म त्या काळी बॉक्स ऑफिसवर मोठी हिट ठरली होती. आता ही फिल्म नव्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
राम गोपाल वर्मा यांनी दिली माहिती
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ‘रंगीला’ चा पोस्टर शेअर करत री-रिलीजची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले,
“रंगीला 4K डॉल्बीमध्ये री-रिलीज होत आहे. आमिर खान, जैकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर आणि ए.आर. रहमान यांना खूप शुभेच्छा. रंग पुन्हा परत येत आहेत.”
या पोस्टरमध्ये चित्रपटातील वेगवेगळे सीन दाखवले असून संपूर्ण लीड कास्टही दिसत आहे.
RANGEELA Re Releasing in 4 K DOLBY … CONGRATS #AamirKhan @UrmilaMatondkar @bindasbhidu @arrahman The COLOURS are COMING BACK 💐💐💐💃🏼💃🏼💃🏼 pic.twitter.com/rswDQCHs81
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) September 11, 2025
‘रंगीला’ची कथा
‘रंगीला’ हा एक लव्ह ट्रँगल आहे. उर्मिला मातोंडकरची व्यक्तिरेखा ‘मिली’ हिरॉईन होण्याचे स्वप्न पाहते. आमिर खान म्हणजेच ‘मुन्ना’ हा तिचा बालमित्र असून तो ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकीटे विकतो. मिलीला आधी छोट्या भूमिका मिळतात, पण प्रसिद्ध अभिनेता राज कमल (जैकी श्रॉफ) तिला एका मोठ्या चित्रपटासाठी संधी देतो. जसजशी मिली हिरॉईन बनते, तसतसे मुन्ना आणि राज कमल दोघेही तिच्यावर प्रेम करू लागतात.
बॉक्स ऑफिस, यश आणि पुरस्कार
‘रंगीला’ने प्रदर्शना वेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ए.आर. रहमानचे संगीतही त्या काळी प्रचंड गाजले. या चित्रपटासाठी रहमानला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार, राम गोपाल वर्मा यांना सर्वोत्कृष्ट कथा, तसेच जैकी श्रॉफ यांना सपोर्टिंग ॲक्टर पुरस्कार मिळाला होता.
आता ही फिल्म पुन्हा एकदा नव्या तंत्रज्ञानासह (4K डॉल्बी) प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.





