Ramayana : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; आणखी एका बड्या सिनेमाचा रेकॉर्ड मोडणार?
भारतासह परदेशातही चित्रपटाला प्रतिसाद मिळत असल्याचे कमाईच्या आकडेवारीतून दिसत आहे. आता या चित्रपटाची नजर वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील वरच्या स्थानांवर आहे.

Ramayana : बॉक्स ऑफिसवर सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण : पार्ट १’. रणबीर कपूरची प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील झलक, यशचा रावणाच्या भूमिकेतील दमदार अंदाज आणि भव्य व्हीएफएक्स यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
भारतासह परदेशातही चित्रपटाला प्रतिसाद मिळत असल्याचे कमाईच्या आकडेवारीतून दिसत आहे. आता या चित्रपटाची नजर वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील वरच्या स्थानांवर आहे. विशेष म्हणजे, ‘दृश्यम ३’च्या जागतिक कमाईचा आकडा गाठण्यासाठी ‘रामायण’ला आणखी सुमारे ८० कोटींची कमाई करावी लागणार आहे. मात्र एवढ्या प्रचंड बजेटच्या चित्रपटाला हिट ठरण्यासाठी नेमकी किती कमाई करावी लागणार? हा प्रश्नही चर्चेत आला आहे.
चार दिवसांत भारतात किती कमाई?
बॉक्स ऑफिस कलेक्शनचा मागोवा घेणाऱ्या सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण : पार्ट १’ने पहिल्या चार दिवसांत भारतात २३८.८५ कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई केली आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन २८५.२० कोटी रुपये झाले आहे. परदेशातील बाजारपेठेतून चित्रपटाने २२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ५०७.२० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
चार दिवसांच्या कमाईवर नजर टाकली तर पहिल्या दिवशी ६४.८५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४८.०५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६९.८० कोटी आणि चौथ्या दिवशी ५६.१५ कोटी रुपयांची भारतातील निव्वळ कमाई झाली आहे.
‘दृश्यम ३’चा विक्रम मोडण्यासाठी किती कमाई हवी?
‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाहता आता त्याची तुलना यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांशी केली जात आहे. ‘दृश्यम ३ : द कन्क्लूजन’चे जगभरातील कलेक्शन सुमारे ५८७.६१ कोटी रुपये आहे. तर ‘रामायण’ने चार दिवसांत ५०७.२० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे ‘दृश्यम ३’चा हा आकडा ओलांडण्यासाठी ‘रामायण’ला आणखी सुमारे ८०.४१ कोटी रुपयांची कमाई करावी लागेल.
दुसरीकडे, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ‘रामायण’समोर केवळ विक्रम मोडण्याचेच नव्हे, तर दीर्घकाळ बॉक्स ऑफिसवर कमाई टिकवण्याचेही आव्हान आहे.






