प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (दि. 21) अंतिम दिवस होता. माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार, तर नगरसेवकांच्या 18 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, तीन प्रभागांत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्र.1 (अ) मधून किशोर संभाजी थिगळे (अपक्ष), प्रभाग क्र.3 (ब) मधून अनिरुद्ध (दिनेश) दीपक सांडभोर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) तर प्रभाग क्र.10 (ब) मधून सुप्रिया राहुल पिंगळे (शिवसेना) हे तिन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेना उमेदवाराने नागरिकांच्या एकमतानंतर माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी पक्षनिहाय उमेदवार किरण चंद्रकांत आहेर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), गणेशकुमार लक्ष्मण इंगवले – अपक्ष, मंगेश वसंत गुंडाळ – शिवसेना, बापू किसन थिगळे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवाजी नंदकुमार मांदळे – भाजपा कोटी रुपयांच्या ‘लिलाव’ची चर्चा नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र.1 मध्ये तब्बल एक कोटी रुपयांचा ‘लिलाव’ झाल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे. सर्वसाधारण जागेसाठी बोली एक कोटी रुपयांच्या वर गेल्याची, तर महिला जागेसाठी सुमारे 22 लाखांपर्यंत पोचल्याची चर्चा नागरिकांत आहे. पुरुष जागा बिनविरोध झाल्यानंतरही महिला जागेसाठी कोणीही माघार घेतली नसल्याने तिघी अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्या. तथापि, याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याचे तसेच अधिकार्यांकडून यास दुजोरा मिळालेला नसल्याचे समजते.