भाजपची मोर्चेबांधणी सुरू!!! नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे सादर

Maharashtra Local Body, Municipal Elections 2025 | राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यानंतर आता भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक नगरपालिकेमध्ये निरीक्षक पाठवून मोर्चेबांधणी केली होती. या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि शहर कार्यकारिणीशी चर्चा करून प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात आली आहे.
यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी भाजपकडून कसून चाचपणी करण्यात आली आणि उमेदवार ठरवण्यात आले. तसेच नगराध्यक्ष कोण असावा, याबाबतही निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. याशिवाय मित्र पक्षांसोबत युती करायची की स्वबळावर लढायचे? यासंदर्भात देखील निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.
भाजपकडून प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठवण्यात आले होते. विविध आघाड्यांच्या अध्यक्षांसह भाजपची प्रत्येक शहरात ६१ जणांची कार्यकारिणी आहे. यांच्याद्वारे त्या शहराचे रहिवासी असलेले जिल्हा पदाधिकारी, महापालिका पदाधिकारी यांची चर्चा करून नगराध्यक्षपदाचे योग्य उमेदवार कोण, हे ठरवण्यात आले आहेत. यामधूनच भाजपकडून प्रत्येक शहरात तीन नावे ठरवण्यात आली आहे. या ३ नावांचे सर्वेक्षण तातडीने केले जाणार असूनप्रत्येक शहरातील मतदारांना या उमेदवाराबाबत काय वाटते? याचा आढावा सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांद्वारे समोर येत आहे. Maharashtra Local Body, Municipal Elections 2025 |
2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी
दरम्यान, राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असेल. या निवडणुका ऑक्टोबरच्या अखेरीस अद्ययावत केलेल्या मतदार यादीनुसार घेण्यात येतील. तसेच निवडणूक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे पार पडेल आणि यासाठीची आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. Maharashtra Local Body, Municipal Elections 2025 |
हेही वाचा:
दगाबाज रे…! उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर; थेट शेतकऱ्याच्या बांधावर जात करणार सरकारची पोलखोल





