भाजपला आज मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष; रवींद्र चव्हाण स्विकारणार सूत्र

Ravindra Chavan | माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सोमवारी एकच अर्ज आला. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा मंगळवारी अर्थात आज केली जाणार आहे. रवींद्र चव्हाण यांचा पदग्रहण समारंभ मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठविले होते. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. पक्षाच्या राज्य परिषदेचे अधिवेशन मंगळवारी मुंबईत होत असून, त्यात चव्हाण हे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील.
रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, चार वेळा आमदार, राज्यमंत्री व मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या चव्हाण यांनी सांभाळल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोकणात भाजपच्या विस्तारामध्ये रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. Ravindra Chavan |
हेही वाचा:
Pune District : संत गोरोबाकाका, नागेश्वर आगमनाने रेडणीमध्ये चैतन्य





