मुंबईत पुढील महापौर भाजपचाच – अमित शहा

मुंबई – मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार , असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. तसेच राजकारणात सर्वकाही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक-एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे, अशा शब्दांत अमित शाह त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी “मिशन 150′ असे म्हणत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला. दरम्यान, त्यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला.
2014मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे गटाला शह?
एकीकडे भाजप आणि शिवसेनेचा वाद कायम आहे. मात्र दुसरीकडे नुकताच शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपशी युती करत राज्याचे सरकार स्थापन केलेल्या शिंदे गटाला भाजप योग्य वागणूक देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आहे. मात्र अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावरून महापालिका निवडणुकीत भाजपकडून शिंदे गटाला शह दिला जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला. आता मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली, असेही शहा यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील चार महिन्यांत मुंबई महापालिकांचे बिगुल वाजणार असून, शिवसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यातील ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपने थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केले आहे.





