मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने जोरदार खेळी खेळली आहे. ठाण्यात आणि शरद पवार यांच्या नंदुरबारातील गडात भाजपने मोठे पक्षप्रवेश घडवून आणत राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर नंदुरबारात शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, भाजपची निवडणूक रणनीती चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि ठाण्याचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी, माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सरैय्या यांच्यासोबत वागळे इस्टेट परिसरातील अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. २०१२ मध्ये सरैय्या यांनी सावरकरनगर प्रभागातून निवडणूक जिंकून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारकटक्के यांचा पराभव केला होता. २०१७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तरीही वागळे इस्टेटमध्ये त्यांचा दबदबा कायम आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत वागळे इस्टेट परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नंदुरबारात शरद पवारांचा गड ढासळला नंदुरबार जिल्ह्यातही भाजपने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. शहादा तालुक्यातील प्रभावी नेत्या आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश नंदुरबारात भाजपच्या प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.