Amit Shah : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार” – अमित शाह
बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच राज्यातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप सरकार प्राधान्याने करेल.

Amit Shah – आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी व्यक्त केला. बंगालमध्ये सत्ता स्थापन होताच राज्यातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप सरकार प्राधान्याने करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बिहारमधील सीमांचल भागातील अररिया येथे सशस्त्र सीमा दलाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह बोलत होते. पश्चिम बंगालच्या सीमा या भागाला लागून आहेत.पश्चिम बंगालमधील निवडणुका आता तोंडावर आहेत.
तेथे भाजपचे सरकार येताच आम्ही एक-एक घुसखोर शोधून त्यांना बाहेर हाकलून देऊ, असे शाह म्हणाले. घुसखोरीचा प्रश्न केवळ राजकीय नसून तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे शाह यांनी अधोरेखित केले.
घुसखोरांमुळे सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघडत असून, त्याचा फटका स्थानिक सामान्य नागरिकांच्या हक्काच्या रेशन आणि इतर सरकारी सुविधांवर बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांना या समस्येचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगत, मोदी सरकार लोकसंख्याशास्त्रीय संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील मागील विधानसभा विजयाचा उल्लेख करताना गृहमंत्री म्हणाले की, विरोधकांनी कितीही टीका केली असली, तरी येथील जनतेने आम्हाला घुसखोरीविरोधी भूमिकेसाठीच कौल दिला आहे. या मोहिमेची सुरुवात बिहारच्या सीमांचल भागातूनच केली जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.





