आगरतळा – भारतीय जनता पक्षाने पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोट येथे करण्यात आलेला हवाई हल्ला याचा निवडणूक जिंकण्यासाठी सन 2019 साली वापर केला असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ मार्क्सवादी नेते माणिक सरकार यांनी केला आहे. सत्त्यपाल मलिक यांनी पुलवामा प्रकरणात केलेल्या गौप्यस्फोटाच्या अनुषंगाने त्यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले की पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान मारले गेल्यानंतर देशात जे वातावरण निर्माण झाले त्याचा वापर भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी केला असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की बालाकोट प्रकारानंतर आमच्या पक्षाने त्याचवेळी या विषयी शंका उपस्थित केली होती. या मागे अतिशल खोल कटकारस्थान आहे असेही त्यांनी नमूद केले. महागाई आणि बेरोजगारीचे गंभीर विषय मागे टाकण्यासाठी हा विषय त्यावेळच्या निवडणूक प्रचारात वापरला गेला. सत्यपाल मलिक यांनी यावर खुलेपणाने भाष्य केल्यानंतर त्याला पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराकडून उत्तर देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी त्यावर अजून मौन साधले आहे असे ते म्हणाले. या विषयी आता माजी लष्कर प्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी यांनीही जाहीर शंका व्यक्त केली आहे याकडेही माणिक सरकार यांनी लक्ष वेधले आहे. सत्यपाल मलिक यांनी जाहीर संशय व्यक्त केल्यानंतर आता त्यांना सीबीआयच्या नोटीसा येऊ लागल्या आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची गरज निर्माण झाली आहे असेही त्यांनी नमूद केले.