One Nation-One Election: भाजपचे 20 हून अधिक खासदार सभागृहात गैरहजर, पक्ष पाठवणार नोटीस

One Nation-One Election: ‘वन नेशन-वन इलेक्शन’ विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. यावेळी सभागृहात गैरहजर राहणाऱ्या खासदारांना भारतीय जनता पक्ष (भाजप) नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने मंगळवारी आपल्या लोकसभा सदस्यांना तीन ओळींचा व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. विधेयकासाठी मतदान झाले तेव्हा भाजपचे 20 खासदार सभागृहात उपस्थित नव्हते. याबाबत पक्षाने या लोकांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधेयक जेपीसीकडे पाठवले –
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. एक राष्ट्र-एक निवडणूक विधेयक म्हणून ओळखले जाणारे संविधान (129 वी सुधारणा) विधेयक, 2024 हे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केले. हे विधेयक मांडल्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे.
विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते –
लोकसभेत हे विधेयक मांडण्याच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली. इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर कागदावर मतदान झाले. देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मार्चमध्ये अहवाल सादर केला होता. या अहवालाला या वर्षी सप्टेंबरमध्ये मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अहवालात लोकसभा तसेच विधानसभा आणि पंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.





