Jharkhand elections 2024: भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पंतप्रधान मोदींसह 40 नेत्यांचा समावेश

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. हे नेते झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार करणार आहेत.
झारखंड निवडणुकीचे वेळापत्रक –
राज्यातील पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली, तर नामांकनाची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. 28 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज छाननीची तारीख आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 43 जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, दुसऱ्या फेरीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली तर नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज छाननीची तारीख आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. उर्वरित 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार?
झारखंड मुक्ती मोर्चाने तीन यादीत एकूण 41 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने 21 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विरोधी एनडीएमध्ये भाजप 81 पैकी 68 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर सुदेश महतोच्या ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला (AJSU) 10 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला (जेडीयू) दोन तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) एक जागा देण्यात आली आहे. दरम्यान अद्याप बहुतांश जागांवर जागावाटप झालेले नाही.





