पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लाॅटरी ?

पुणे – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख २३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ ( Pune MP Murlidhar Mohol) यांची केंद्रात मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात भाजपचे ९ खासदार निवडून आले असून त्यातही महायुतीच्या सर्वाधिक जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले निवडून आलेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे पुण्याबाबत असलेले विशेष प्रेम लक्षात घेता मोहोळ यांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर मोहोळ हे गुरूवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या दिल्लीत पक्षाची नवनिर्वाचित खासदारांची बैठक होणार आहे.
२०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यावर विशेष लक्ष राहिले आहेत. केंद्रात सत्ता स्थापनेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यात पुणे देशात दुसऱ्या क्रमांवर होते त्यानंतर या योजनेची सुरूवात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यातूनच करण्यात आली.
त्यानंतर मेट्रो प्रकल्प, नदी सुधार योजना, समान पाणी योजनेसाठी केंद्राचा निधी अशा अनेक मोठया योजनांमध्ये पुण्याचा समावेश राहिला असून मागील वर्षी पुण्याला जी २० परिषदेचा मानही देण्यात आला.
त्यामुळे आयटीनगरी, क्रीडा नगरी, उद्योग नगरी म्हणून वेगाने विकसित होणारे पुणे शहर असल्याने पंतप्रधान मोंदीकडून अनेकदा पुण्याबाबत गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. त्यातच, केंद्रातील अनेक मंत्र्यांना या लोकसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्याने भाजपकडून पुण्याला मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तूळात वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभांमध्ये केवळ दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. या निकालाचे पडसाद विधानसभेत उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रात एक मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यातच, मराठा आरक्षण आंदोलनामुळे भाजप विरोधात असलेली नाराजी दूर करण्यासाठी मराठा समाजाला मंत्रीपद दिले जाऊ शकते त्यात, पश्चिम महाराष्ट्रात छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश असू शकतो.





