मुंबई – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी सांगितले की, भाजप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या एखाद्याला तिकीट देणे आम्ही स्वीकारणार नाही, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. आम्ही मलिक यांना पाठिंबा देणार नाही आणि वेगळी भूमिका घेऊ, असेही शेलार म्हणाले. अनुशक्तीनगर मतदारसंघ मुलीला सोडला – मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील अणुशक्ती नगरचे विद्यमान आमदार मलिक हे यावेळी मानखुर्द-शिवाजी नगरमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. तर राजकारणात पदार्पण करणारी त्यांची मुलगी सना यांना अणुशक्ती नगर मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. मलिक यांना 2022मध्ये अटक – मलिक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. 2022 मध्ये NIA ने दाऊद आणि छोटा शकील आणि टिगर मेमन यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात मलिक यांना अटक करण्यात आली होती. मलिक यांना या वर्षी जुलैमध्ये वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने मित्रपक्ष भाजपच्या आक्षेपानंतरही आमदारांना आपल्या गोटात घेतले. आता त्यांच्या उमेदवारीवरून भाजप-अजित पवार गटात वादविवाद सुरु आहे. नवाब मलिकांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात – राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र सना मलिक यांचा उमेदवारी अर्ज भरायची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती आज 22 ऑक्टोबर रोजी दुपारीच समजली आहे. भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याची चर्चा होत आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक – शेख यांच्यासाठी सोडला आहे.