काँग्रेसचा “ब्लॅक पेपर” अन् भाजपचा गंभीर आरोप…

BJP on black paper – मोदी सरकारविरोधातील ‘ब्लॅक पेपर’वरून भाजपने गुरुवारी काँग्रेसला खडे बोल सुनावले. ‘विरोधी पक्षाने आपली “काळी कृत्ये” लपवण्यासाठीच ‘ब्लॅक पेपर’ आणला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई होत असल्याने वेदना होत असलेल्या विरोधकांना ही कारवाई थांबवायची आहे.’ असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज, केंद्र सरकारच्या कथित अपयशावर प्रकाश टाकणारा “ब्लॅक पेपर” प्रसिद्ध केला. यानंतर भाजपतर्फे देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
“भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. ज्यांनी जनतेचा पैसा लुटला आहे त्यांना थारा नाही. आम्ही तुमची काळी कृत्ये लोकांसमोर उघड करू,” असं भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले.
ज्यांनी भ्रष्टाचार केला आणि जे लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांमागे होते ते ‘ब्लॅक पेपर’ आणत आहेत, “घोटाळ्यांची कहाणी” संपली असून मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असल्याचं, प्रसाद म्हणाले.
BJP on black paper
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सत्तेत असताना भारताला नाजूक अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जायचे. “पॉलिसी पॅरालिसिस” अशी आपल्या अर्थव्यवस्थेची ओळख होती. तीच अर्थव्यवस्था आता जगामध्ये पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परकीय चलन साठा आणि परदेशी गुंतवणूक वाढत आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी, अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती आणि बेरोजगारी वाढल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला. युपीएपेक्षा मोदी सरकारने भरपूर रोजगार निर्माण केले असून महागाईचा मुकाबला देखील चांगल्या प्रकारे केला असल्याचा दावा केला.
“आम्ही काँग्रेसचा पर्दाफाश करू. लोक याला महत्त्व देणार नाहीत,” असही ते म्हणाले.
काँग्रेसच्या ‘ब्लॅक पेपर’मध्ये “बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातीय जनगणना करण्यात आलेले अपयश आणि महिलांवरील अन्याय” या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मोदींवर हल्ला करताना खर्गे म्हणाले, मोदींना जेव्हा महागाईबद्दल विचारले जाते तेव्हा ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलतात. सध्या मोदी राज्य करत आहेत त्यांनी काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे.
इतर महत्वाच्या बातम्या
राहुल गांधींचं वादग्रस्त विधान म्हणाले,’PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर…”
आम आदमी पक्षाचा इंडिया आघाडीला धक्का; परस्पर जाहीर केले उमेदवार…





