भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांना काही काळासाठी मिळणार मुदतवाढ?

नवी दिल्ली –भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. तशात त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पक्षाला नव्या अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. मात्र, ती निवड होईपर्यंत नड्डा यांना काही काळासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
नड्डा यांचा कार्यकाळ ३० जूनला समाप्त होणार आहे. मात्र, भाजपमधून देशभरात संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदल करण्याचे संकेत मिळत आहेत. त्या प्रक्रियेचा प्रारंभ सदस्य नोंदणी मोहिमेतून होईल. ती मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य पातळीवर पक्षांतर्गत निवडणुका होतील. त्यामुळे नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा मार्ग मोकळा होईल.
अर्थात, ती सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही अवधी लागेल. तोपर्यंत नड्डा यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते. भाजपच्या घटनेत नुकताच बदल करण्यात आला. त्यानुसार, निकडीच्या स्थितीत अध्यक्षाच्या कार्यकाळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाला देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असलेल्या संसदीय मंडळाकडून नड्डा यांना मुदतवाढ देण्याचे पाऊल उचलले जाऊ शकते.
नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत कार्याध्यक्षाच्या नियुक्तीचा पर्यायही स्वीकारला जाऊ शकतो. विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष असताना २०१९ यावर्षी लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीनंतर शहा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यावेळी नड्डा यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जानेवारी २०२० मध्ये पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले. यावेळी भाजपकडून तशीच व्यवस्था केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





