नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या 16 आणि 17 जानेवारी रोजी राजधानीत होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप पक्ष या बैठकीत आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांबाबतही विचारविनिमय करणार आहे. तसेच या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. नड्डा यांचा पक्षाध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे.
Satara : इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये – आमदार शशिकांत शिंदे
सत्ताधारी भाजपने 2024 मध्ये जिंकण्यास कठीण वाटणाऱ्या लोकसभेच्या जागांची संख्या 144 वरून आता 160 पर्यंत वाढवली आहे.
यामध्ये जनता दल (युनायटेड) सोबतची युती तोडून बिहारमधील बहुतांश मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवण्याची पक्षाने तयारी केली आहे. या 160 जागांवर पक्ष आपले संघटनात्मक जाळे विस्तारण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत असून, ज्यासाठी भाजपने अनेक केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असणाऱ्या समित्या स्थापन केल्या आहेत. यासह पक्षाचे प्रमुख नेतेही या जागांवर नियमितपणे लक्ष ठेवून आहेत.
2019 च्या निवडणुकीत भाजपने अशाच कठीण जागांची यादी तयार केली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात विजय मिळवला होता.
पक्षाने 2019 मध्ये 543 सदस्यांच्या लोकसभेत 303 जागा जिंकल्या, तर तत्पूर्वी 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांतील प्रस्तावित विधानसभा निवडणुका या आगामी लोकसभा निवडणुकीची “सेमी फायनल’ मानल्या जात आहेत.
अनेक राज्यांमध्ये यावर्षी निवडणुका
ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्येही यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. नागालॅंड, त्रिपुरा आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च महिन्यामध्ये संपत आहे. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. तर मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीची सत्ता आहे. वरील तीनही राज्यांत एकाच वेळी निवडणुका होणार असून, त्यानंतर कर्नाटकात निवडणुका होणार आहेत.
कर्नाटकच्या 224 सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्याचवेळी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणाच्या विधानसभांचा कार्यकाळ यावर्षी डिसेंबर आणि जानेवारी 2024 मध्ये वेगवेगळ्या तारखांना संपेल.