मेढ्यात भाजपला विरोधकांपेक्षा स्वकीयांचाच धोका? शिवेंद्रराजेंसमोर इच्छुकांची फौज थंड करण्याचे मोठे आव्हान

प्रभात वृत्तसेवा
मेढा ( विजय सपकाळ ) – जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायतीची निवडणूक कोण जिंकणार अशीच चर्चा जोरदार सुरू आहे. सध्याच्या एकूणच परिस्थितीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच ताब्यात एकहाती सत्ता राहण्याची खात्री व्यक्त होत आहे. मात्र, त्यांना पक्षातील इच्छुकांची प्रबळ फौज थंड करण्यात कितपत यश येईल यावरच सत्तेच गणित अवलंबून राहील. विरोधकांपेक्षा स्वर्कींयांचाच धोका या निवडणुकीत भारतीय जनता पाटीला अधिक आहे. विरोधक आणि नाराज गट एकवटले तर एक मोठं आव्हांन उभं राहू शकते असेही होवू शकते, असाही मागील निवडणुकीतील अनुभव आहे.
यामध्ये निकाल कोणाचा लागेल हे निश्चित असले तरी 17 वार्डमध्ये एका एका जागेसाढी पाच ते आठ जण प्रबळ इच्छूक आसून कोणाचं कोठं पुनवर्सन करायचे यासाठी नेतेमंडळीची कसोटी लागणार आहे.मेढा ही नगरपंचायत झाली असली तरी येथे गाव म्हणूनच मोठा पगडा आजही आहे. गावकी, भावकी, समाज, नातेवाईक, पै पाहुणे व मतदार असलेले परगावी नोकरदार, एका एका वॉर्ड मध्ये असलेला एकाच समाजाचा विजयी मतांचा टक्काही येथे विचार कराय लावणारा आहे.
विकासाबरोबरच निवडणुकीत होणारा मोठा खर्च. त्यामुळे लोकसंपर्काबरोबर आर्थिक सक्षम उमेदवारच तो पक्ष असू की अपक्ष आपला विजय निश्चित खेचून आणतो असा येथे मागील झालेल्या निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत मायाबाजारातील उमेदवार अधिक प्रभावशाली राहणार अशीही चर्चा आहे.मेढ्यातील निवडणुकीत भाजपसह महायुतीत अलबेल आहे असं वाटत असले तरी आतल्या आत बरेच काही शिजत आहे.
वसंतगडावरुन उमेदवारीची सुत्रे..
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा या निवडणुकीत निर्णय अंतिम असला तरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांच्या शिफारशी शिवाय उमेदवारांना आपली परीक्षा पास करता येणार नसून सध्या वसंतराव मानकुंमरे भाऊंची वसंतगडावर हालचाली गतिमान झाल्या असून उमेदवारांची चाचपणी करत आहेत.
भाजपमधून इच्छूक उमेदवार..
भाजपमधून इच्छूक उमेदवार जावळी पंचायतीच्या माजी सभापती रूपाली वारागडे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असली तरी त्यांना रूपाली देशपांडे यांचे आव्हान आहे. मेढयाच्या माजी उपनगराध्यक्षा कल्पना जवळ यांनीही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पंचायत समितीच्या माजी उपसभापती धनश्री कारंजकर, मेढ्याच्या माजी सरपंच मनिषा गुरव, सुवर्णा गोरे, शुभांगी देशमुख व माजी सभापती संगीता वारागडे यांचीही उमेदवारीची मागणी आहे. विरोधी पक्षातून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून रेश्मा करंजेकर, राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाकडून सुनिता पार्टे, माजी नगसेविका निलम जवळ, माधुरी सुर्वे इच्छुक आहेत.
ही निवडणूक ठरणार लक्षवेधी..
ही निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघातील असल्याने प्रतिष्ठेची होणार असली तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या तालुक्यातील मुख्यालय असलेल्या मेढा गावाची असल्याने त्यांची भूमिका कार्यकर्त्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व शिवसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अकुंशबाबा कदम व सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी घेतलेल्या मेळाव्यामुळे ही निवडणुक निर्णायक ठरणार आहे.
माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ व अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती अमित कदम यांच्याही भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पंचायत समितीचे माजी सभापती सुहासदादा गिरी यांची या निवडणूकीतील भूमिका महत्वपूर्ण राहणारी आहे.





