Satara Municipal Council – सातारा नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला. नगरसेवक भाजपचे असले तरी आघाडीच्या राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडले नसल्याचे चित्र सभागृहात स्पष्ट दिसून आले. दीड तास चाललेल्या चर्चेनंतर सभा घाईघाईने गुंडाळण्यात आल्याने खासदार गटाच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेनंतर उपनगराध्यक्षांच्या दालनात उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर आणि स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘माथी भडकवण्याचे उद्योग करू नका,’ असा थेट इशारा बनकर यांनी दिल्याने वातावरण अधिकच तापले. यामुळे सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी अतिक्रमण आणि शहर विकास या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चा भरकटत गेल्याने या मुद्द्यावर ठोस निष्कर्ष ववा निर्णय होऊ शकला नाही. भाजपकडून सभेच्या आदल्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या पार्टी मीटिंगलाही काही नगरसेवकांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले. यावरुन पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला. परिणामी, सभागृहात एकसंध भूमिका मांडण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 66 नुसार प्रत्येक नगरसेवकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना अनेकांना विषयाची प्रशासकीय प्रक्रिया विशेषतः नगरपरिषद संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करण्याची पद्धत याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांची लेखी परवानगी घेतली असली तरी चर्चेदरम्यान अनेकदा विषयांतर होत असल्याने सभेचा मूळ उद्देशच हरवला. भाजप या सभेत सुशांत महाजन, हेमलता भोसले, भारती शिंदे, विनोद मोरे, जयवंत भोसले, ॲड. शुभांगी काटवटे, वैशालीराजे भोसले, पंकज चव्हाण, शंकर माळवदे आदी नगरसेवकांनी विविध विषय मांडले. मुद्देसूद मांडणीऐवजी अनेकदा चर्चा भरकटत गेल्यामुळे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना वारंवार ‘अजेंड्यावरील विषयांवरच बोला’ अशी सूचना करावी लागली. अधिनियमातील तरतुदीनुसार नगराध्यक्षांना विषय मांडण्यास परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असला, तरी सभागृहातील शिस्त राखण्यात प्रशासनाची कसरत होताना दिसली. एकूणच, शहरातील अतिक्रमण, विकास आणि प्रशासनिक पारदर्शकता यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर ठोस निर्णय अपेक्षित असताना, अंतर्गत राजकारण, अपुरी तयारी आणि प्रक्रियेचे अज्ञान यामुळे सभा गाजली खरी; पण दिशाहीन ठरली. सातारा पालिकेतील नगरसेवकांनी कामकाज नियमावलीचा सखोल अभ्यास करून अधिक जबाबदारीने भूमिका मांडण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली. मुस्कटदाबी नकोच नको… नगरपालिकेच्या सभेत नव्या- जुन्या सदस्यांचा समावेश आहे. नव्याने सभागृहाचे कामकाज पाहणाऱ्या सदस्यांना पहिल्याच सभेत बोलू इच्छिणाऱ्यांची मुस्कटदाबी झाल्याचे चित्र दिसले. पालिका सभेच्या कामकाजात सहभागी होताना सभागृहात समस्या कशा मांडायच्या, आपल्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची, आपल्या प्रभागापुरते सीमित न होता पूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये कसा सहभाग द्यायचा या साऱ्या गोष्टी ज्येष्ठ सदस्यांकडून नवख्यांनी शिकावे अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चाही न करता सभा गुंडाळून ज्येष्ठांनीच नवख्यांना वेगळे शिक्षण देण्याचे तंत्र अवलंबले. राजकारण निवडणुकीचे असावे विकासाच्या कामात नको. त्यामुळे सभागृहातील बोलण्याच्या अधिकारावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न यापुढे तरी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.