पुण्यात भाजप ‘एकला चलो रे’! महापालिका निवडणुकीसाठी युतीला रामराम, इनकमिंगलाही ग्रीन सिग्नल

प्रभात वृत्तसेवा
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने, पुण्यात महापालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात घेतल्या.
या बैठकीत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी भाजपचे १२५ उमेदवार निश्चित निवडून येतील असे स्पष्ट करत, पुण्यात युती नको असे संकेत दिले. त्यातच, आता युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिल्याने भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकीत शहर पदाधिकाऱ्यांकडून अशी माहिती देण्यात आली की, मागील निवडणुकीत भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले होते, तर पाच नगरसेवक शिवसेनेतून भाजपमध्ये आले आहेत.
याशिवाय, २०१७ मध्ये १५ ते २० नगरसेवक २०० पेक्षाही कमी मतांनी पराभूत झाले होते. त्यातच आणखी काहीजण पक्षात येण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत सध्याच्या १६५ जागांमध्ये युती शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे भाजपची निवडणूक जिंकून महापालिका ताब्यात ठेवण्याची तयारी पाहता, पुण्यात भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट आहे.
इनकमिंगला ग्रीन सिग्नल..
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांचे अनेक माजी नगरसेवक येण्यास इच्छुक आहेत. यामुळे पक्षातील काही कार्यकर्ते नाराज असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनकमिंग चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये कोणताही स्ट्राँग कार्यकर्ता आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे. साधारणपणे आमचे कार्यकर्ते त्यांना सामावून घेतात, त्यामुळे भाजप मोठा झाला आहे. काही वेळा एखाद्या ठिकाणी नाराजी निर्माण होते, पण आम्ही त्यांना समजावून सांगू आणि तेही समजून घेतील. असे सांगत, पुण्यात पुढील काळात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.





