Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ‘ऑपरेशन लोटस’ आता अंतिम टप्प्यात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत तीन माजी आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यादरम्यान हा पक्षप्रवेश निश्चित झाला. फलटणमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत हजेरी लावली, आणि याचवेळी पक्षप्रवेशाची तारीख ठरली. मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय, बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सोलापूर दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप आमदारांनी विरोध केल्याने त्यांच्या प्रवेशाला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. 29 ऑक्टोबर रोजी हे चारही माजी आमदार भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि माढा येथील राजकारणात यामुळे मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असून, सहकारी संस्थांद्वारे त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. ‘ज्याच्या हाती सहकारी संस्था, त्याच्याकडे सत्ता’ हे सोलापूरचं राजकीय समीकरण आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी आणि अजित पवार यांना शह देण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला सोलापूर जिल्ह्यात बळ मिळेल आणि विरोधकांसमोर आव्हान उभं राहील. मात्र, या घडामोडींमुळे महायुतीत नवे वाद निर्माण होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.