George Soros: भाजप आणि कॉंग्रेसमध्ये ‘जॉर्ज सोरोस’वरून जुंपली

नवी दिल्ली – अमेरिकी व्यावसायिक, गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये शाब्दिक युद्धाचा भडका उडाला आहे. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्पष्टीकरणाची मागणी भाजपने केली आहे. तर, उद्योगपती गौतम अदानी यांना वाचवण्यासाठी अमेरिकेबरोबरचे संबंध धोक्यात आणले जात आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसने सोडले आहे.
मोदी सरकार तसेच भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने अदानी प्रकरण लावून धरले आहे. त्या शह देण्यासाठी भाजपने सोरोस यांचा विषय पुढे केला आहे. सोरोस फाउंडेशनकडून एफडीएल-एपी या संस्थेला आर्थिक मदत दिली जाते. त्या संस्थेच्या सोनिया सहअध्यक्षा आहेत.
संबंधित संस्थेचा काश्मीरला स्वतंत्र देश मानण्याच्या विचाराला पाठिंबा आहे, असा आरोप भाजपने रविवारी केला. त्यानंतर सोमवारी भाजपने तो विषय आणखी पुढे नेला. भारतात अस्थिरता निर्माण करण्याची परदेशी शक्तींची इच्छा आहे. त्या शक्तींशी कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे. एफडीएल-एपी संस्थेच्या सहअध्यक्षा म्हणून सोनियांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली.
सोरोस यांच्याशी हातमिळवणी केल्याचे भाजपचे आरोप कॉंग्रेस नेते पवन खेडा यांनी फेटाळून लावले. एका व्यक्तीसाठी दुसऱ्या देशाबरोबरचे संबंध धोक्यात आणण्याचा अधिकार कुणालाही नाही, असा इशारा त्यांनी दिला. संसद अधिवेशन सुरू झाल्यापासून आम्ही काही मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मात्र, अदानींशी संबंधित मुद्दा उपस्थित केला की सत्ताधारी अस्वस्थ होतात, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे अदानी आणि सोरोस या मुद्द्यांवरून भाजप, कॉंग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे. त्या मुद्द्यांवरून सोमवारी संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले.





