Birth Death Registration: जन्म-मृत्यूनंतर नोंद २१ दिवसांत करणे बंधनकार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत संबंधित कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्यास उशीर झाल्यास, शासनाने विहित केलेल्या नियमानुसार, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच जन्म-मृत्यू नोंदणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, निबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रात घडलेल्या घटनांचीच नोंदणी करावी. अनावश्यक अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी जन्म-मृत्यूची नोंदणी वेळेत करावी.
तसेच, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय व सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा-कॅशलेस व पेपरलेस उपचार पद्धतपात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करावी. आयुष्मान कार्ड तयार करून ग्रामीण व दुर्गम भागात कार्ड वितरणावर अधिकाधिक भर द्यावा. आयुष्यमान कार्डबाबत शिबिराचे आयोजन करावे, आशा व अंगणवाडी सेविकांचा सहभाग घेत पात्र कुटुंबाची माहिती गोळा करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. वंदना जोशी यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध समित्यांचे सदस्य तसेच संबंधित इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरिकांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ अंतर्गत जिल्हा दक्षता समिती कार्यरत आहे. लिंग निदानाबाबत https://amchimulgimaha.in/ या संकेतस्थळावर तसेच 18002334475 आणि 104 या टोलफ्री क्रमांकावर तक्रार करण्याबाबत माहिती द्यावी. सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी करून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.





