Newasa : शिरसगावात ‘शासन आपल्या दारी’; महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन
Newasa : शिरसगावात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. स्वावलंबी महिला ग्राम संघ कार्यालयाचेही उद्घाटन झाले.

Newasa : आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या संकल्पनेतून शिरसगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन आणि शासकीय योजना मेळावा गुरुवारी (दि. ८) उत्साहात झाला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायत समिती नेवासे अंतर्गत नारी शक्ती महिला प्रभाग संघ, कुकाणा यांच्या सेवा संकल्प अभियानातून ‘स्वावलंबी महिला ग्राम संघ, शिरसगाव’ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. रत्नमाला विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
विविध योजना एकाच ठिकाणी
‘शिरसगावातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना एकाच ठिकाणी देण्यात आली. यासाठी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग तसेच महिला आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती दिली.
महिला बचत गटांना स्वावलंबी होण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचीही माहिती देण्यात आली. शासकीय कामांसाठी ग्रामस्थांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जावे लागू नये, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, रत्नमाला लंघे-पाटील, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन, हर्षदा देवरे, प्रदीप ढोकणे, दत्तूनाना पोटे, नवनाथ साळुंके, गणेश लंघे, तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे, प्रभाग समन्वयक ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिरसगावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





