Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचे आता राजस्थानवर सावट; वेग मंदावला मात्र धोका कायम

अहमदाबाद – अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये विध्वंस केल्यानंतर आता ते राजस्थानमध्ये पुढे सरकले आहे. चक्रीवादळ शनिवारी सकाळी राजस्थानमध्ये पोहोचले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पण धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा राजस्थानच्या वाळवंटात कहर सुरु आहे.
सॅटेलाइट फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील 36 तासांत हे चक्रीवादळ हळूहळू शमण्याची शक्यता आहे. मात्र चक्रीवादळामुळे येत्या 12 तासांत राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुजरातनंतर राजस्थानच्या बारमेर, सिरोही, उदयपूर, जालोर, जोधपूर जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे हवामान खात्याने बाडमेर, जालोर, सिरोही आणि पालीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, रेल्वेने बाडमेरमधून जाणाऱ्या 14 गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे उदयपूरहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.
दुसरीकडे वादळ धडकून 36 तास उलटले तरी गुजरातच्या अनेक जिल्हांत मुसळधार पाऊस सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे सौराष्ट्र-कच्छसह पालनपूर, थाराड, पाटण, बनासकांठा आणि अंबाजी जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नद्यांना पूर आल्याने पाटणमधील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. थाराड शहरात अद्यापही ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
गृहमंत्र्यांकडून हवाई पाहणी
वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी कच्छची हवाई पाहणी केली आणि मदत व बचावकार्य केले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही होते.
आम्ही एका मोठ्या आपत्तीशी लढण्यास सक्षम आहोत, असे पटेल यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी वादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी म्हटले.





