पुणे-नगर महामार्गावर दुचाकीस्वारांची कसरत, जीव मुठीत घेऊन प्रवास

रांजणगाव गणपती (वार्ताहर) : पुणे नगर महामार्गावर खंडाळे गावच्या हद्दीत खंडाळा माता येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आशीर्वादाने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असून अनेक दुचाकी स्वार घसरून पडले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रवाशांना विशेषता दुचाकी स्वरांना पुणे नगर महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून प्रवास करताना अक्षरशा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यातच पुणे नगर महामार्गावरील काही ठिकाणी तर रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर काही ठिकाणी अक्षरशः पाण्याचे डपके साचून राहिलेले आहेत.
तसेच पुणे नगर महामार्गावर योग्य ठिकाणी साईड पट्ट्यांचा अभाव तर योग्य ठिकाणी साऱ्या नसल्याने पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.





