बाईक ॲम्बुलन्स ठरतेय अनेकांसाठी वरदान

नवी दिल्ली – गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहोचवणे ही रुग्णवाहिकेची जबाबदारी असते. पण अनेक दुर्गम ठिकाणी चार चाकी रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ॲम्बुलन्सचे काम करणारी दुचाकी वरदान ठरत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दुर्गम प्रदेशांमध्ये गर्भवती महिलांसाठी अशा प्रकारच्या दुचाकीवरील रुग्णवाहिका सोयीच्या ठरत आहेत छत्तीसगड राज्यामध्ये गेले कित्येक वर्षे याबाबतचा प्रयोग सुरू असून तो यशस्वी झाला आहे.
चार चाकी रुग्णवाहिकांच्या तुलनेत दुचाकी रुग्णवाहिका सोपी वेगवान आणि दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी सोयीची मानली जात आहे. छत्तीसगड मधील नारायणपूर हा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा मानला जातो त्याशिवाय हा अतिशय दुर्गम असा प्रदेश आहे. रस्त्याने किंवा जल वाहतुकीने सुद्धा हा जिल्हा व्यवस्थितपणे जोडला गेलेला नाही साहजिकच या प्रदेशातील लोकांना जेव्हा रुग्णवाहिकेची गरज भासते तेव्हा चार चाकी रुग्णवाहिकेचा वापर अशक्य होतो.
याच कारणामुळे या प्रदेशांमध्ये आता दुचाकीवरील रुग्णवाहिका लोकप्रिय झाल्या आहेत. दुचाकीला लावलेल्या साईडकारमध्ये रुग्णाला ठेवून त्याची वाहतूक केली जाते साईड कार संपूर्णपणे झाकलेली असल्यामुळे रुग्णाला उन्हाचा किंवा पावसाचा त्रासही होत नाही 2014 नारायणपूर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन दुचाकींच्या सहाय्याने या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आणखी काही दुचाकी या सेवेसाठी जोडण्यात आल्या आहेत या योजनेला सरकारचाही पाठिंबा असून आता या प्रदेशांमध्ये तब्बल 16 दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत नारायणपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी महिलांसाठी ही दुचाकी वरदान ठरत आहे.
लहान मुले जेव्हा आजारी पडतात तेव्हा किंवा गर्भवती महिलांना जेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात तेव्हा या दुर्गम प्रदेशातून रुग्णालयाच्या ठिकाणी या दुचाकीच्या माध्यमातून रुग्णांना सुरक्षितपणे पोहोचवले जाते 4000 पेक्षा जास्त रुग्णांनी या दुचाकी रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे, याव्यतिरिक्त सरकारच्या आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा या दुचाकींचा वापर केला जातो त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण असो किंवा करोना लसीकरण असो त्या कालावधीमध्ये सुद्धा या दुचाकी रुग्णवाहिका वापरण्यात आल्या.





