Dinanath Mangeshkar Hospital | गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. या अहवालात गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माेठी चूक आहे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. गर्भवती तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अनामत रक्कम १० लाख रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल पाच सदस्यांची चौकशी समिती गठित केली. फडणवीस हे काल पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी भिसे कुटुंबीयांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आता चौकशी समितीने प्राथमिक अहवाल दिला असून सविस्तर अहवाल दोन दिवसांत राज्य सरकाला ही समिती सादर करणार असल्याची माहिती आहे. रुग्णालयावर सुरुवातीलपासूनच अनामत रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालय प्रशासनाने काल एक पत्रक जारी करत रुग्णाकडून डिपॅाजिट म्हणजेच अनामत रुक्कम घेतली जाणार नसल्याचे जाहीर केले. मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एक गर्भवती महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता. विविध पक्ष संघटनांनी रुग्णालयाबाहेर आंदाेलन केले. भिसे कुटुंबाकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले. तसेच तनिषा भिसे यांच्या नणंदेने संपूर्ण घटनाक्रम प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला. या प्रकरणात पार्दर्शकपणे सर्व चौकशी केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना घडूच नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने एसओपी जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांना या घटनेबाबात प्रतिक्रिया देत भिसे कुटुंबीयांची भेट घेतली.