Pragya Satav : राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे स्वर्गीय नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या १८ डिसेंबर रोजी त्या आपल्या हाती कमळ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या प्रज्ञा सातव पत्नी आहेत. हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात सातव कुटुंबाचा दबदबा राहिलेला आहे. काँग्रेसचे मोठं नाव म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते; पण कोव्हिड काळात सातव यांचे निधन झाले. त्यानंतर पक्षाला उतरली कळा लागली. राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. २०१४ च्या मोदी लाटेतही महाराष्ट्रातून काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे राजीव सातव यांनी भुषविली होती. त्यांच्या पश्चात काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव झाल्या. नुकत्याच राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यातच प्रज्ञा सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्या भाजपमध्ये जाणार असून, याबाबतची नेमकी माहिती समजू शकलेली नाही. कोण आहेत प्रज्ञा सातव? डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 या काळात हिंगोलीचे खासदार होते. 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. प्रज्ञा सातव विधान परिषदेच्या आमदार आहेत. २०२१ मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. हेही वाचा : माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता