Pune : पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ अल्पवयीनावर ‘प्रौढ’ म्हणून खटला चालणार?

पुणेः कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण राज्यभर गाजले. या अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आता या अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यास गती येणार आहे.
पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यामुळे या अर्जावरील सुनावनीला आता गती प्राप्त होणार आहे. बाल न्याय मंडळावर सरकारने नियुक्त केलेल्या दोन्ही सामाजिक कार्यकर्ता सदस्यांना दर मंगळवारी आणि शुक्रवारी यासाठी हजर रहावे लागणार आहे.
त्यानुसार सुनावणीच्या तारखा निश्चित करण्यात येणार आहेत. या तारखांना सरकार पक्ष व बजाव पक्षाने हजर राहवे लागणार आहेत. याबाबतचा निर्णय बाल न्याय मंडळाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. या अपघातानंतर कारचालक अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध लेखनाच्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर या अपघात प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
त्यानुसार न्यायालाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित केली. मात्र, या समितीमधील दोन्ही सदस्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारने १० ऑक्टोबर २०२४ रोजी या सदस्यांची हकालपट्टी केली होती. अखेर या रिक्त पदांवर दोन नवीन सामाजिक कार्यकर्ता सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकरण काय?
कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ च्या मध्यरात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारने दुचाकीस्वार तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूस कारचालक अल्पवयीन मुलाला कारणीभूत ठरवले होते. त्याला ३०० शब्दांच्या निबंधासह जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी संबंधितावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाकडे केला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी पोर्शे कार जप्त केली आहे, ती परत मिळण्यासाठी मुलाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज केला आहे.





