दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंची होणार चौकशी

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार नितेश राणेंची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावादेखील नितेश राणेंनी केला होता. आता मुंबई पोलीस आमदार नितेश राणेंची चौकशी करणार असून यामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येणार? राणे काय पुरावे सादर करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमके काय आहे?
दिशा सालियान या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मॅनेजर होत्या.8 जून 2020 रोजी मुंबईतील घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियान हिचा मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती.
कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर थोड्याच वेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहत होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा पडलेली दिसली. या प्रकरणाचा तपास पुढे सीसीबीआयकडे सोपवण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असे सीबीआय तपासात समोर आले होते. मात्र अजूनही दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळातूनही अनेक आरोप करण्यात येत आहेत. या मृत्यूमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे दिशा सालियान या आपल्या मॅनेजरच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत हादेखील आपल्या खोलीत मृत अवस्थेत आढळला होता.





