Pune : स्वारगेट प्रकरणातील मोठी अपडेट; पीडितेचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र, केली ही मोठी मागणी

पुणेः स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून पीडितेने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. असीम सरोदे यांना नियुक्त करावे, अशी मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे वकिलांचे नाव पाठविली आहेत. मात्र, अॅड. असीम सरोदे यांनी माझ्या बाजूने न्यायालयात खटला लढवा, अशी इच्छा पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. तिच्या या मागणीला पोलीस आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
स्वारगेट लैंगिक अत्याराच्या घटनेनंतर तपासात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत गेले. आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी गुनाट गावातून अटक केली. या अटकेच्या कारवाईसाठी पोलिसांना स्थानिकांनी मोठी मदत केली. गुनाट येथील शेतात आरोपी गाडे लपून बसला होता. सुरुवातीला पोलिसांनी ड्रोन आणि डॅाग स्कॅाडच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर मध्यरात्री गुनाट गावातीलच काही लोकांनी गाडे हा येथील एका शेतात असल्याचे सांगिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू
न्यायालयाने १२ मार्चपर्यंत गाडेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज शेवटची तारीख आहे. पोलिसांनी दरम्यानच्या काळात गाडेची कसून चौकशी केली. मात्र, गाडेने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची माहिती आहे. गाडेचा मोबाईल देखील अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया पोलीस करत आहेत. त्याच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येतील असा पोलिसांना संशय आहे. आता या प्रकरणात न्यायालय कोणता नवा आदेश देणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.





