कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

Manikrao Kokate : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 1995 सालच्या एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजुर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे.
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. आमच्याकडे घर नाही आणि आमचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.





