मोठी बातमी! निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांची घरी सातारा पोलिस दाखल; तब्बल तीन तास चौकशी

Pune : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस पोहचले असून त्यांची चौकशी केली जात आहे. तब्बल तीन तास सातारा पोलीसांकडून देशमुख यांची चौकशी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या महिलेला पोलिसांनी रक्कम स्विकारताना पकडून अटक केली.
पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणा संदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांची चौकशी सातारा पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरून रवाना झाले आहेत. यामुळे आता या प्रकरण कोणती नवी माहिती येते हे पाहावे लागणार आहे.





