विश्रांतवाडी : मेट्रोचे विस्तारीकरण करत सर्व नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यानुसार विश्रांतवाडीमार्गे मेट्रो आळंदीपर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यासाठी बैठका घेऊन सविस्तर चर्चा होत असते. मागील आठवड्यात देखील महामेट्रोचे सर्व अधिकारी व संचालक श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव तयार करायला सांगितला आहे. विश्रांतवाडीमार्गे आळंदीपर्यंत मेट्रो सुरू करावी, यासाठी माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे हे माझ्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत असतात. त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधिस्थळापर्यंत मेट्रो जोडणार असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मेंटल कॉर्नर येथील नानासाहेब परूळेकर विद्यालयात खासदार जनसंपर्क सेवा अभियान पार पडले. यावेळी मोहोळ बोलत होते. याप्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, उपायुक्त सोमय मुंडे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड, राहुल भंडारे, सुनीता गलांडे, श्वेता गलांडे, ऐश्वर्या जाधव, मंगेश गोळे, संतोष खांदवे, संदीप मोझे, गणेश बाबर, सुनील खांदवे, प्रीतम खांदवे, मोहनराव शिंदे, अर्जुन जगताप, सुभाष चव्हाण, शैलजीत बनसोडे, धनंजय जाधव, पूजा जाधव, लिंगु साखरे, जितेंद्र जगताप, ऍड.नितीन कुचेकर यांची उपस्थिती होती. शामा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मोहोळ म्हणाले, आळंदी हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्रातील लाखो भाविक तेथे येतात. पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण असेल मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय, भाविकांची ये-जा असते. त्यामुळे त्यांना सोयीचे होण्याकरता आळंदीला मेट्रोने जोडण्याचा विचार निश्चित केला जाणार असल्याचे मत यांनी व्यक्त केले. मेट्रोच्या मागणीला यश मिळणार याचे समाधान : अनिल टिंगरे विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुल व ग्रेड सेपरेटरच्या (भुयारीमार्ग) आराखड्यात अनेक त्रुटी होत्या. त्यात मेट्रो प्रकल्पाचे नियोजनही करण्यात आले नव्हते. दूरदृष्टीचा विचार करत मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनासह उड्डाणपूल करण्याची मागणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व पालिकेकडे केली होती. त्या मागणीनुसार मेट्रोचे विश्रांतवाडीमार्गे आळंदीपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर सर्वांचा प्रवास जलद व सुखकर होणार आहे. आपण मेट्रोच्या विस्ताराबाबत केलेल्या मागणीला यश मिळणार असल्याचे समाधान वाटत आहे.