10वी, 12वी परीक्षांमध्ये पेपरफुटी प्रकरणे टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

पुणे – दहावी-बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मोबाइल अथवा सोशल मीडियातून व्हायरल झाल्याची घटना निदर्शनास आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा (प्रथा) यंदाच्या परीक्षेपासून बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
बारावीची परिक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची दि. 2 मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचा ताण हलका व्हावा व पेपरच्या वेळेआधीच प्रश्नपत्रिकेचे वाचन करण्याची संधी मिळावी, या हेतूने विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी प्रश्नपत्रिका 10 मिनिटे आधी दिली जात होती. गेल्या आठ वर्षांपासून ही पद्धत सुरू होती. परंतु, प्रश्नपत्रिका व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्याने याला प्रतिबंध व्हावा, परीक्षा कॉपीमुक्त पार पाडाव्यात, यासाठी 10 मिनिटे आदी प्रश्नपत्रिका देण्याची प्रथा यावर्षीपासून बंद करण्यात येत असल्याचे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
अर्धा तास अगोदर पोहचणे अनिवार्य –
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात 10:30 वाजता आणि दुपारच्या सत्रात 02:30 वाजता परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका सकाळच्या सत्रात 11:00 वाजता, तर दुपारच्या सत्रात 03:00 वाजता विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
“जीपीआरएस’ प्रणालीची अट –
प्रश्नपत्रिकेची गोपनियता अबाधित राहण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचण्यासाठी व उत्तरपत्रिका आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहायक परिरक्षक (रनर) यांना प्रवासादरम्यान “जीपीआरएस’ प्रणाली सुरू ठेवण्याची अट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे नेमके ठिकाण समजणे शक्य होणार आहे.
त्यामुळे बोर्डाकडून निर्णय –
दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटकांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. त्यात पेपर फुटीच्या अफवा ऐन परीक्षा सुरू होण्यापूर्वी गेल्या काही वर्षांपासून होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.





