Pune : दहावी, बारावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या जून-जुलैमधील पुरवणी परीक्षांचे प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसार २४ जूनपासून इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात पुरवणी परीक्षा होणार आहे. सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरुस्त्या असल्यास अथवा विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्व प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.





