Pune : जिल्हा परिषदेच्या शाळा दहावीपर्यंत

पुणे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा या इयत्ता आठवीपर्यंत असतात. मात्र, आता पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दोन शाळांना या वर्षी नववीच्या तुकड्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता गावपातळीवरच दहावीपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. याबाबत दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दहावीपर्यंत शाळांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी खेड तालुक्यातील निघोजे आणि दौंड तालुक्यातील गलांडवाडी या तीन जिल्हा परिषदेच्या शाळांना आठवीनंतर नववीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच, खेडमधील धानोरे या शाळेचा प्रस्तावही विचाराधीन आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
गावापर्यंतच दहावीपर्यंत शाळा झाल्याने मुलांची बाहेरगावी जाण्यासाठी होणारी पायपीट थांबून गावातच शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. दहावीपर्यंत शाळा सुरू करणे ज्या शाळांना शक्य आहे, त्या शाळांकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावेत, अशा सूचनाही नाईकडे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या वर्षी नववी आणि पुढच्या वर्षी दहावीपर्यंत शिक्षण गावातच आणि तेही मोफत मिळणार आहे. त्यामुळे हा प्रयोग क्रांतिकारी ठरणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
शिक्षणातील गळतीला पायबंद
शिक्षणात विशेषत: ग्रामीण भागातील मुली गावपातळीवरील शाळेतील दुसऱ्या शाळेत जाण्यास सहसा तयार नसतात. त्यामुळे मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण जास्त असते. त्या पार्श्वभूमीवर दहावीपर्यंत जिल्हा परिषदेतून शिक्षण मिळण्यास मुलांची शिक्षणातून होणारी गळतीही थांबेल. सर्वांना मोफत शिक्षण मिळेल. त्यामुळे हा निर्णय शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.





